img

घर शहराच्या मध्यवर्ती भागात असण्याचे फायदे

औरंगाबादमध्ये घर खरेदी करायची झाले की, सहजपणे एक गोष्ट समोर येते, ती घर खरेदीच्या बाबतीत शहराच्या मध्यवर्ती भागात आणि दुसरे म्हणजे शहराच्या बाहेर घर घेण्याची इच्छा. यामध्ये ज्यांचं बजेट कमी आहे ते थोडासा औरंगाबादच्या बाहेरच्या परिसराचा विचार करताना दिसतात.

घर खरेदीच्या वेळी प्रत्यक्ष घर कसं आहे, तिथं पाणी, वीज, लिफ्ट या सोयी आहेत का, हा विचार झाल्यानंतर पहिला मुद्दा येतो, तो पार्किंगचा. त्यानंतर जवळची रुग्णालयं, शाळा, कॉलेज, रेल्वेस्टेशन, बस स्थानक, विमानतळ, भाजी मंडई, दूध डेअरी, इस्त्रीचं दुकान, गिरणी या सोयी विचारात घेतल्या जातात. राहणीमानाचा दर्जा चांगलाच ठेवायचा, तर अनेकजण औरंगाबादच्या मध्यवर्ती स्थानी घर घेण्यास पसंती देताना दिसतात. मध्यवस्तीतलं घराच्या बाबतीत वरील सोयी सहज उपलब्ध होतात. औरंगाबादाच्या परिसरातलंच थोडंसं बाहेरच्या बाजूला घर घ्यायचं, तर मात्र या सोयींचा विचार करावा लागतो.

औरंगाबादमध्ये मध्यवस्तीत घर घेताना भाजी मंडईपासून रेल्वेस्टेशनपर्यंत अनेक सोयी सहज उपलब्ध असलेल्या दिसतात. मात्र, जवळच असणाऱ्या या सोयींमुळे घराची किंमतही वाढलेली दिसते. आपलं बजेट भक्कम असेल, तर या सुखसोयींसह उत्तम घर मध्यवस्तीत सहज मिळू शकतं.

जास्त बजेट या सारख्या काही बाबी थोड्या बाजूला सारल्या, तर मध्यवस्तीतल्या घराचे फायदेही कमी नाहीत. मध्यस्थानी अगोदरच विकसित वसाहत असल्याने अधिक कालावधीपासून तिथली माणसं आणि कुटुंबं एकमेकांना ओळखत असल्यामुळे अनेकांना हा परिसर अधिक सुरक्षित वाटतो. थोड्या वेळासाठी घराबाहेर पडणं असो किंवा काही दिवसांसाठी गावाला जाणं असो, मध्यवस्तीतल्या घरांच्या बाबतीत शेजारच्या कुटुंबावर आपल्या घराची जबाबदारी टाकून जाता येतं. ती हमी औरंगाबादच्या आसपासच्या परिसरातील घरांच्या बाबतीत देता येईलच, असं नाही.

मध्यवस्तीत अनेक नावाजलेल्या शाळा, कॉलेजही आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची सोय या नावाजलेल्या शाळा - कॉलेजमधून अधिक चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. हीच गोष्ट नामांकित रुग्णालयांच्या बाबतीत लागू होते. औरंगाबादच्या मध्यवर्ती भागात अनेक चांगले ‘फूड स्पॉट’ही आहेत. अनेक वर्षांपासून, पिढ्यापिढ्यांचा खाद्यव्यवसाय असलेले आणि नावाजलेले ‘फूड स्पॉट्स’ म्हणजे खवय्ये असलेल्यांसाठी मेजवानीच ठरते. याशिवाय मनोरंजनाच्या दृष्टीनं चित्रपटगृह आणि नाट्यगृहंही मध्यवस्तीत एकवटलेली दिसतात. या आणि यासारख्या अनेक कारणांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात घर घेणे फायदेशीर आणि सोयीचे असते.